Wednesday 18 May 2011

माणसांचं प्रेम अन्‌ प्रेमाचे गाव...!

आपण माणूस या नात्याने माणसांच्या प्रदेशात राहतो. अवतीभवती सगळीकडे तशी माणसांचीच गर्दी असते. आता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपला जास्तीत जास्त वावर मानवसमूहातच राहणार. कधी आपण याच माणसांसोबत अगदी निरुपाय म्हणून वावरतो, कधी अपरिहार्यता असते. तर कधी काही माणसं जीवनात उत्कट रंग भरणारीही असतात. सरसकट सगळीच चांगली किंवा सगळीच वाईट अशी माणसं नसतातच मुळी. आपल्या तात्कालिक समजुतींनुसार आपण त्या त्या वेळी त्या त्या माणसाला चांगलेपण अथवा वाईटपण बहाल करीत असतो. अर्थात हे सारेच आपला लाभ किंवा हानी याच निकषांवर ठरते. माणूस एकमेकांसाठी जीव देतात आणि प्रसंगी घेतात देखील.
 
वळणावळणांवर माणसांचे काफिले भेटत राहतात. अवचित एखादा माणूस आयुष्याचा तो क्षण उजळवून टाकायचं सामर्थ्य बाळगून असतो. आपलं तत्क्षणीचं आयुष्य गर्भरेशमी करण्यास, वळणच वळणदार करून टाकणारी ही माणसं काळजाचा गाभारा करून टाकतात.
 
शांताबाई शेळकेंच्या ओळी अशावेळी हमखास आठवून जातात-
कधी रुजलेली असतात ही नावरूप नसलेली नाती?
कसे फुटतात त्यांना अचानक कोवळे संदर्भ?
आणि जीवनाच्या रख्ख कोरड्या विस्तारातही
कसे झुलू लागते एक आपलेपण निरपेक्ष, अर्थगर्भ?
म्हणूनच असं आयुष्याचं वेडंवाकडं वळण वळणदार करून टाकणारी माणसं जपली पाहिजेत. त्यांचं मनातलं वास्तव्य अवघं जीवन प्रासादिक करण्याला पुरेसं असतं. आयुष्याशी झगडायला बळ देणारं असतं. तसं तर अगदीच नकोशी वाटणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात चारदोनच येत असावीत. पण काही जणांच्या दुःखाला तेवढंच भांडवल पुरेसं असतं. एरवी माणसांना माणसांची तशी ऍलर्जी असू नये. माणसं वाचता आली, की ती हळूहळू कळू लागतात. उमजू लागतात. माणूस वाचण्याचं साक्षरपण यावं लागतं, हे खरं. 

त्या विस्तीर्ण मैदानातल्या गोल ट्रॅकवर एक जोडपं फिरायला आलेलं. वातावरण तसं रम्य. उंच उंच झाडांमधून जाणारा तो ट्रॅक. संध्यामग्न झाडं एकमेकांना बिलगून काही तरी गूज सांगत असलेली. अन्‌ मावळतीच्या सूर्याला उद्याच्या भेटीचं आश्‍वासन मागणारी. पण त्या जोडप्यामध्ये अखंड निंदा चाललेल्या. अर्थात माणसांच्याच. झाडा- जनावरांच्या निंदा करण्याइतकी माणसं अद्याप मोठीच झालेली नाहीत. शेजार-पाजार-आप्त-स्वकीय. माणसांचे प्रेमाचे, निंदेचे, असूयेचे सगळे विषय माणसांपासून सुरू होतात अन्‌ माणसांपाशीच संपतात. फुलांची निंदा करता येत नाही अन्‌ फुले माणसांची तेवढी दखलही घेत नाहीत.
 
एकुणात काय तर चर्चेत येणारी सगळी माणसंच. माणूस म्हणून माणसांच्याही वरची पातळी गाठून माणसं निरखता येऊ नये का? काहीजणांसाठी माणसं परिस्थितीसापेक्ष असतात. म्हणून ती अनुनय आणि असूयेतच हेलकावे खात असतात.
 
एकदा एका गावात भल्या पहाटेच एक यात्रेकरू येऊन पोचला. गावाबाहेर वेशीपाशी एक म्हातारा बसला होता. या नवख्या यात्रेकरूने म्हाताऱ्याला विचारले, "या गावातली लोक कसे आहेत? मी आपले गाव सोडले आहे आणि मला या गावात थांबायचे आहे.'' त्या वृद्धाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले अन्‌ तो म्हणाला, "तू जे गाव सोडले त्या गावातली माणसं कशी होती?'' हा प्रश्‍न ऐकताच त्या यात्रेकरूच्या डोळ्यात संताप आणि तिरस्कार तरारला. "त्यांची आठवणही माझ्यासमोर काढू नका. इतके दुष्ट लोक या जगात नसतील. त्यांच्यामुळेच तर मला ते गाव सोडावे लागले.'' त्यावर तो वृद्ध म्हणाला, ""मग मला निराश वाटतंय, कारण या गावातली माणसंही त्या गावातल्या माणसांहून काही फारशी वेगळी नाहीत. या गावातही तसेच दुष्ट लोक आहेत.'' तो प्रवासी निघून गेल्यानंतर दुसरा एक प्रवासी आला. त्यांच्यातही तोच संवाद झडला. "तू सोडलेल्या गावातील लोक कसे होते?'' यावर क्षणात त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, "आमच्या गावातल्या इतके चांगले लोक मी कुठेच बघितले नाहीत. पण नाईलाजास्तव मला गाव सोडावे लागत आहे.'' त्यावर तो वृद्ध त्याला म्हणाला, "मग तू मोठ्या खुशीने ये. मी तुझं स्वागत करतो. या गावातले लोक तुला तिथल्यापेक्षा अधिक चांगले वाटतील. इथंही फार चांगले लोक राहतात. याच नव्हे, तू कुठल्याही गावात जा. तुला प्रेमळच माणसे भेटतील.''

शहरात निर्धारित गतीनं धावत राहिलात तर तुम्हाला ग्रीन सिग्नलच मिळत राहतो. तसंच प्रेमाच्या गावाहून निघालात की कुठलंही गाव तुम्हाला प्रेमळ माणसांचंच मिळत राहातं. अखेर गाव म्हणजे घरांचा समूह नव्हेच. नाहीतर हरप्पा मोहेंजोदारो "गावांचे अवशेष' म्हटले गेले असते. तिथेही आपण माणसांच्याच खुणा शोधतो. गाव एकमेकांच्या ओढीनं बांधल्या गेलेल्या माणसांचाच समूह असतो. माणसं प्रेमळ असली की मग गावही प्रेमाचा होत असतो...

No comments:

Post a Comment