Tuesday 16 August 2016




नारळातलं पिंपळ
तिस-या मजल्यावरच्या आमच्या फ्लॅटच्या माझ्या खोलीच्या खिडकीपलीकडल्या अंगणात अगदी समांतर एक साधारण पंचवीस-तीस फुटांचं नारळाचं झाड आहे. झाडांच्या पानांकडे एकसारखं बघितलं की ती आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं, ते खरंही आहे.  असं वाचलंही आहे एके ठिकाणी.  खोलीत इथं संगणकावर बसलं अन् बाहेर सहज पाहिलं की सुरुवातीला नुसतंच न्याहाळत बसायचे त्या नारळाच्या झाडाच्या मोठाल्या कातरलेल्या झिळमिळणा-या पानांकडे. अहोरात्र सळसळणा-या या पानांशी हळूहळू माझं मैत्र कधी जुळलं कळलंदेखील नाही. कोण म्हणतं मैत्री फक्त जिवंत व्यक्तींशीच होते! झाडांशी देखील घनिष्ठ मैत्री होऊ शकते, फक्त तेवढं तरल व्हावं लागतं, ऐकतात झाडं-पानं आपलं बोलणं, तेवढा संयम असावा लागतो. मग शब्देविण संवादु अव्याहत सुरू असतो... असं झाडा-पानांशी असलेलं मैत्र हाडामासाच्या जिवंत माणसांपेक्षा जास्त आश्वस्तपण बहाल करणारं असतं अनेकदा...   नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं  आपण या झाडाशी चक्क संवाद साधतो,  शेअर करतो अनेक गोष्टी.
  हे झाड किती वर्षांचं असेल सांगता यायचं नाही, पण आमची मैत्री मात्र असेल एका तपाची... कितीतरी क्षण, प्रसंग शेअर केले असतील मी त्याच्यासोबत. येत्या काही वर्षांमधले उद्वेग, मनोभंग, तितकेच हळवेओले आनंदाचे, सोहळ्यांचे  क्षणदेखील... माझ्या प्रत्येक वेदना-संवेदनेचा तो साक्षीदार आहे. त्याच्या पानांची सळसळ पाहिली नाही, की चुकल्याचुकल्यासारखं होतं. इतकी या झाडाच्या अस्तित्वाची सवय झाली आहे. दिवसभरातून त्याची एकदा दखल घेणं हे श्वासोच्छवासाइतकं सहज झालेलं आहे.
पण हल्ली येत्या काही महिन्यांमध्ये मला या नारळाच्या झाडात काही बदल जाणवू लागले होते. याची साल जरा सोलल्यासारखी, उखडल्यासारखी दिसते आहे, घरातलं किंवा जिव्हाळ्याचं माणूस अचानक अशक्त वाटू लागावं, किंवा त्याच्यात काही बदल जाणवू लागावेत आणि त्याने मन काजळून जावं तितकीच अस्वस्थता मला या नारळाच्या झाडामधल्या काही बदलांमुळे दाटून आली. मग वाटलं असेल काही तरी ऋतूंचे बदल. आपल्यात नाही होत का बदल?  पण जरा निरखून बघितलं तेव्हा जरा वेगळंच दृष्य दिसलं. या नारळाच्या झाडाच्या छातीवर चक्क एक छोटंसंच पिंपळाचं रोपटं उगवलेलं होतं.  अन् बघता बघता काही दिवसांमध्ये तर ते चांगलं पोकलं, बाळसलंदेखील.  अगदीच कोवळं असल्यापासून माझं त्या रोपट्याकडे लक्ष जात आहे.  पिंपळाच्या रोपट्याचं बीजारोपण कसं झालं वगैरेच्या बारीक तपशीलात, शास्त्रीय विश्लेषणात मला नाही पडायचं.
पण तरीही ना त्या पिंपळाच्या बिजानं विचारलं असणार नारळाला, येऊन रोवून घेऊ का रे तुझ्या काळजाच्या आत आत मी मला स्वतःला, अन् ना नारळानेदेखील त्याच्या या हरकतीवर शंका घेतली असणार. पण या दृष्यानंतर माझा मेंदू मात्र जरा जास्तच गतीनं चालायला लागला.  पिंपळाला आपल्या भवितव्याची चिंता नसली तरी पिंपळाचं कालांतराने महाकाय वृक्षात रूपांतर होत असतं... नारळाचं ते सरळ झाड बिचारं भविष्यातल्या या वृक्षाची मुळं पेलवण्यासाठी समर्थ आहे काय, नक्कीच नाही. ते असमर्थच ठरणार आहे... किती दिवस पुरणार हे झाड त्या रोपट्याला.  वगैरे वगैरे.
मला आताशा त्यांच्या या निसर्गाचा एक अंश असलेल्या तरीही अनैसर्गिक गळाभेटीची धास्ती आणि काळजीदेखील वाटू लागली आहे... तिकडे मात्र ते रोपटं जेवढ्या हक्कानं त्या झाडात रुजलं तेवढ्यात ताकदीनं हे नारळाचं झाड त्याला पेलवून धरतं आहे. तसंही ती दोघं माणसं थोडीच आहेत ना, परिणामांचा किंवा फायद्या-तोट्याचा विचार करत आपापले सेफ झोन निवडायला...
यावर्षीच्या उन्हाळ्यात झळांनी नारळाच्या झाडाचा देह सुकला होता पिंपळाचं रोपटंसुद्धा कोमेजलं होतं, तरीदेखाल वरची झुळझुळणारी पानं सुकून काटक्या झालेल्या, मात्र मुळं नारळात घट्ट रोवून बसलेल्या पिंपळाच्या रोपावर वैशाखाच्या झळा सोसत सावली धरून होती,  तेव्हाही त्या नारळाकडे बघून मला कसंसच झालं होतं.
ऋतुबदलाने नारळाच्या झाडातली मधुर पोषणद्रव्य पीत आता पिंपळाच्या रोपट्यानं पुन्हा बाळसं धरलं आहे,  पिंपळाच्या गुटगुटीत हिरव्याकंच, लुसलुशीत पानांची लवलव रोजच बघते.  दोघांमधलं मैत्र सुखावणारं असलं तरी पण नारळाची साल आताशा जरा जास्तच उखडल्यासारखी दिसते आहे, यंदा तर नारळंसुद्धा लागली नाहीत. दरवर्षी नारळं लागली की या घराच्या मालकीणीचे जावई बार उचलायला येतात, तो एक कार्यक्रमच असतो. पण यावर्षी तसं काहीच दिसलं नाही. पिंपळाची खोल खोल रुजत चाललेली मुळं नारळाला आता पेलवेनीशी होऊ लागली असेल काय? नारळानं असं मूक मरण स्वीकारलं असेल काय
पिंपळाचं रोप कुठेही उगवलं की पिंपळाच्या वृत्तीची व्यवहारी माणसं लगेच सल्ला देतात, पिंपळाची मुळं खूप चिवट असतात बरं का, तुमच्या भिंतीला एकवेळ तडा जाईल पण याची रोपं आत आत शिरत राहतील. वेळीच काढून टाकायला हवीत. नाहीतर एकदा रुजली की निघता निघत नाहीत...  महाकाय वृक्षात रूपांतरित होणा-या झाडाच्या मुळांची ताकददेखील तेवढीत बलाढ्य असणार, हे कसं सांगावं यांना...
 एका स्नेह्यांकडे एकदा घराभोवतीची भिंत नुकतीच रंगवली होती. छान पांढरी शुभ्र. त्यावर एकदा असंच एक छोटंसं पिंपळाचं रोप उगवलं. अगदीच छोटंसं. त्याच्या लुसलुशीत पानांवरची कोवळी लव इतकी कोवळी की ती बघून अगदी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाच्या लुसलुशीत गालांची आठवण यावी.
पण पुढच्या खेपेला गेले तेव्हा ते रोपटं तिथे नव्हतं. सहज विचारलं, तेव्हा ते गृहस्थ म्हणाले. उखडून फेकलं ते रोपटं. नुसतंच उखडलं नाही, त्या जागेवर जरा ऍसिडही टाकलं. म्हणजे मुळं मुळापासून जळून गेली.  म्हणजे पुन्हा उगवायची भानगड नको. व्यवहाराच्या पातळीवर कितीही समजूत काढायचा प्रयत्न केला स्वतःची तरीही जरा क्रूरच वाटलं ते बोलणं मला... असो...
पण हे माझ्या समोरचं सरळसाधं उंच नारळाचं झाड नाही असं करू शकलं. नारळाचा जीवनरस पित पित दिवसागणिक पिंपळ छान वाढतं आहे. मुळं अधिक खोल आणि घट्ट होताहेत, नवनव्या फांद्या फुटताहेत त्याला. नारळाचं झाड मात्र खंगल्यासारखं भासत आहे. फोफसं होत आहे आतून. त्याच्यातले सूक्ष्म बदल माझ्या नजरेतून सुटत नाहीएत. हे ताठ उभं असलेलं सरळ झाड आता नक्कीच कोसळणार आहे कधीतरी. अन् त्या आडव्या पडलेल्या नारळाच्या झाडावर पिंपळाच्या रोपट्याचं आधी झाडात अन् मग महाकाय वृक्षात रूपांतर होईल कधीतरी... धस्स होतं मला नुसत्या त्या विचारानेच... पण काय करणार? नारळ माणूस नाही, अन् त्याला माणसासारखं जगायला आवडतही नाही...
-    भाग्यश्री पेठकर