Monday 13 October 2014

जगण्यातले काजवे / भाग्यश्री पेठकर हर जर्रा चमकता है...



जगण्यातले काजवे / भाग्यश्री पेठकर

हर जर्रा चमकता है...


वीन वर्षाचा पहिला दिवस. काही योजना, काही संकल्प. हा पहिला दिवस हसत घालवावा, म्हणजे मग आपण वर्षभर हसत राहतो, वगैरे वगैरे. मग चल आज आपण मिळून कुठं तरी जाऊ या... म्हणजे असं वर्षभर सोबत सोबत राहणं होईल.म्हणता म्हणता राहिले याला.
शनिवार, तसा अर्धा सुटीचा दिवस अन् पूर्ण सुटीच्या आदला दिवस. माणसं दगदगीच्या गर्दीत हरवलेली. तसलीच सवय झालेली. त्यामुळे सुटीच्या निवांत दिवशी देखील लगबगीच्या दिवसांची सोय करण्याच्या गडबडीत असतात. आम्ही संध्याकाळचं फिरायला निघालो ते भाजी आणायला.
पूर्वी जून झालेल्या कपड्यांच्या पिशव्या शिवण्याची एकॉनॉमी केली जायची. आता कपडेफाड महागाईने पिशव्यांचं कामच ठेवलेलं नाही. त्यात मोबाईलनं एकांतपण गहाण टाकलेलं. घरच्यांना कधीच फ्री टॉकटाईम नसतो. भाजी घेत असतानाच याचा मोबाईल घणघणला. काय म्हणतोस?’ ‘बापरे!’ ‘बस निघालोच...एवढ्या तीन शब्दांत यानं संभाषण संपवलं अन् आम्ही भाजी घेण्याचं टाकून इस्पितळाकडे धावलो... याच्या मित्राच्या बायकोला मॅसिव्ह हार्टअटॅक आला होता. गाडीला कीक मारली. अन् याच्या मोबाईलवर दुसरा मॅसेज. ती गेली... दवाखान्यात जस्ट वन क्लीकवर झालेली एसएमएसी गर्दी!
अशा ठिकाणचे सगळेच चेहरे एका अज्ञात भयानं झाकोळलेले असतात. अन् इथेच जगण्यातल्या कणाकणाचं महत्त्व लक्षात येत असतं.
‘‘मृत्यू म्हणजे आव्हान आहे. वेळ अजिबात वाया घालवू नकाअसं तो सांगतो. एकमेकांशी योग्य तेच वागा, असं तो सांगतो. म्हणून आपण एकमेकांशी प्रेमानं वागतो.’’ - लिओ एफ. बुस्काग्लआचं वाक्य आठवलं.
‘‘उपर बहोत भिड है, आप नही जा सकते।’’ तिथला गार्ड खेकसला. त्याला लिओचं ते वाक्य माहिती असण्याचं काही कारण नसावं.
‘‘अरे पाच मिनीट रे. फक्त भेटायचं अन् यायचं. तू अडवलं अन् आम्ही प्रामाणिकपणे थांबलो म्हणून तू आमच्यावर रंगदारी करतो आहेस. आमच्या मागचे तर कितीतरी निघून गेले.’’
‘‘ठीक है, ठीक है, जल्दी आना।’’ त्याची अरेरावी.
वर असावं तसंच गंभीर वातावरण. जन्माची सोबतीण गमावलेला आमचा तो स्नेही पंखात चोच खुपसून बसलेल्या गारठलेल्या पाखरासारखा चिडीचूप बसला होता. अशावेळी नेमकं काय बोलायचं असतं? खरंतर बोलती बंदच झालेली असते...
उगाच तिथे रेंगाळून आयुष्याचं झालेलं स्मशान चेह-यावर लेवून आम्ही परत जिना उतरू लागलो. एक एक पायरी मोजत खाली येताना जिन्यातल्या प्रत्येक कोप-याकडे लक्ष गेलं. त्या जिन्याच्या प्रत्येक कोप-यावर आरसे बसवलेले. अगदी नवे कोरे! वर चढताना हे कसं लक्षात आलं नाही? मृत्यूचं दडपण होतं. दिसत सगळंच होतं; पण दिसण्याची जाणीव मावळली होती. आता मात्र त्या आरशात आपलाच चेहरा अनोळखी वाटत होता. आपले चेहरे तपासून घेण्यासाठी आरशांचे असे कोपरे केले असतील का? मग आठवलं की मागे इमारतींमध्ये कोपरे घाण करू नयेत म्हणून देवादिकांच्या प्रतिमा लावण्याची शक्कल लढवण्यात आली होती. तरीही असंख्य इमारतींच्या कोप-यात ईश्वर नावाच्या शक्तीला मानणा-यांना त्याच्या प्रति असलेल्या श्रद्धेची थोडीही तमा न बाळगता थुंकण्याचा आपला हक्क बजावलेला पाहिला होता मी. इथे मात्र प्रत्येक कोपरा अगदी आरशांसारखाच लख्ख होता.
क्षणभर आरशात प्रतिमेला न्याहाळलं. काय भाव आहेत सध्या आपल्या चेह-यावर?  खिन्न, उदास की आणखीन काही वेगळे? येणाजाणा-यांचे चेहरे त्या आरशात सांत्वना केल्याचे कर्तव्य बजावल्याने कृतकृत्य झालेले. लोक भेटायास आले काढत्या पायासवे’ ...
ते स्वच्छ कोपरे मात्र अस्वस्थ करून गेले. अगदी ईश्वर, अल्ला, गॉडच्या प्रतिमा लावल्यावरही थुंकणारे मात्र इथे कसे संयत झाले असतील? आरशात आपणच आपल्यावर थुंकणे कुणालाच कसे जमले नाही? अगदी देवांवरही थुंकणा-यांना? ज्याच्या नावावर दंगली करतात त्या देवावरही थुंकतात लोक इमारतींच्या कोप-यात. मग दंगली देवाच्या अस्मितेसाठी नव्हे तर आपल्या अस्तित्त्वासाठी असतात का? माणसाचे या जगात स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असते, हे सत्य पचवून झाले होते मात्र,  इथे एक थरारक साक्षात्कारच झाला,  माणसाचे स्वतःवर केवळ प्रेमच नसते तर त्याची स्वतःवर प्रगाढ श्रद्धा असते. स्वतःवर आणि केवळ स्वतःवरच... बापरे!
मरण म्हणजे पूर्ण सत्य... त्या सत्याचं दर्शन घेऊन येत असताना आणखी एका बोच-या सत्याची अशी भेट झाली. आरशात आपुलीच प्रतिमा वैरी झाली आपलीच! अखेर एवढंच-
हर जर्रा चमकता है, अनवार-ए- इलाही से
हर सांस ये कहतीं है, हम है तो खुदा भी है...