Sunday, 22 April 2012

एका ‘नकुशी'ची जिदगी


आता स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी कुणी लढा जन्माला आलेल्या त्या मुलीच्या आयुष्याला जन्माला येताच मारुन टाकण्याच्या पलीकडचा हा दर्दनाक प्रकार आहे. तिचा काहीही गुन्हा नसताना सामाजिक विकृतीच्या सुडाचा  द्यायला निघालं आहे. मुलगी नको म्हणून एका आईने नसती औषधं घेतली अन् नसते भोग आलेत. गर्भपात करणे किंवा प्रवास मृदुला करते आहे..


मृदुला डबीर. एक स्त्री. एक चुणचुणीत स्त्री. तिच्यात स्पार्क आहे. पण ती अपंगही आहे. हे अपंगपण नियतीनं लादलेलं असतं तर आपण नाइलाज म्हणून ते स्वीकारत त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ते मानवी कृतीतून (विकृतीतून म्हणणं जास्त संयुक्तिक) आलेलं असल्यानं ते ठळकपणे मनावर बिबत राहातं अन् मन खट्टू होतं. हे सांगणं एरवी तितकंसं गरजेचं नव्हतं, पण या अपंगपणातूनच तिच्या जिगिविषु वृत्तीचीही ओळख होणारी आहे, यातूनच तिची तीव्र जीवनेच्छा अधोरेखित होणार आहे, अन् यातूनच अपंगपणावर मात करीत मनाला सशक्त ठेवीत कसं जगायचं त्याचे पाठ घालून देणारं तत्त्वज्ञान धडधाकट शरीरांच्या पांगळ्या मनांना मिळणार आहे...

मृदुलाच्या घरी गेले तेव्हा ती भितीला टेकून बसलेली. अगदी मांडी घालून. तिचे सगळे ऋतु असेच जातात. समोर एका चौरंगावर लॅपटॉप. अन् हेच तिचं सध्याचं विरंगुळ्याचं, जगाशी संपर्काचं, सवादाचं साधन. मृदुलाचे हात आणि पाय दोन्हीही अधु आहेत.

तळहात, हाताची बोटं तर अगदी वाकडीच झालेली. ती पांगळीही आहे. इंच इंच सरकत ती घरात फिरत असते. पण तिच्या बोलक्या चेहरयामुळे अन् डोळ्यातल्या विलक्षण चमकीमुळे तिच्या शरीराकडे तसं फारसं लक्षच जात नाही.

कसा विषय काढू? ही दुखावली जाईल काय? हिच्याबद्दल आपल्याला कळलं आहे, मृदुलावर भावाची माया करणारया श्री. अतुल वखरेंनी आपल्याला सांगितलं आहे, अन् मग हिला भेटण्याची आपली इच्छा अधिकच तीव्र झाली आहे. पण तरीही... हिच्या जखमेवरची खपली काढण्याचं पातक आपल्यावर येईल काय? सगळ्याच विषयांवरच्या गप्पा मारून झाल्या. ‘‘मला नं थोड्या थोड्या गोष्टींवरून आत्महत्या करणारयांचा रागच येतो,'' या मृदुलाच्या आतापर्यंतच्या चर्चेमधल्या एका वाक्यानं मात्र मी पारच उडाले. तिच्या जवळपास लोळागोळा असणारया शरीरात वसलेल्या एका सशक्त मनातले ते प्रेरणादायी विचार होते. अपंग मनाच्या दृढांच्या जगण्याला बळकटी देणारे.

मृदुला, तुझ्या या अशा अवस्थेमागचं कारण काय? अगदी जन्मत:च... असं विचारलं अन् मग ती बोलतच राहिली... आता जे वयोवृद्ध आहेत त्यांची पिढी तशी बरयापैकी कन्झव्र्हेटिव्ह विचारांची. मुलगा-मुलगी असा भेद करणारी. आजही या परिस्थितीत तसा फारसा बदल झालेला नाही. बंगरुळूला एका बापाने आपल्या तीन महिन्याच्या तान्हुलीला नाही का सिगारेटचे चटके दिले, मान मुरगाळून मारले अक्षरश:. मृदुलाला आधी बहिणी झाल्या. त्यात हिच्यावेळी आईला दिवस गेले, तेव्हा शेजारी-पाजारी, नातेवाईक यांनी त्यांच्या- म्हणजे मृदुलाच्या आईच्या मनात एक नवंच खूळ घातलं. त्यांना जी लक्षणं दिसताहेत किवा जे डोहाळे लागले आहेत ते तर सगळे मुलगी होण्याचे संकेत देणारेच आहेत, असं त्यांचं म्हणणं. (गर्भजल
परीक्षा रोखता येतल पण या असल्या आंदाजांचे काय?) त्यात मृदुलाची आजी (वडिलांची आई) नातवाचं तोंड पाहायला आसुसलेली.

मृदुलाच्या आईला या सगळ्यांचा प्रचंड ताण आला. आता परत मुलगीच झाली तर... या भयापोटी मग त्यांनी गर्भ पाडून टाकण्यासाठी कुठलंसं होमिओपॅथीचं औषध घेतलं. त्यानं गर्भ तर पडला नाहीच; पण वेगळंच काहीतरी उद्भवलं. तिची अभंग मानसिकता जोपासणारं अपंग शरीर. मुलगी नको या विनाशी मानसकितेची शिक्षा आज मृदुला भोगते आहे, तिचा काहीही दोष नसताना...

मृदुलाचा जन्म झाला तेव्हा तशी ती बरी होती. ती शाळेतही जाऊ लागली, पण ती मोठी व्हायला लागली
तसतशी ती चालताना पडू लागली. तिला शिक्षणाची प्रचंड आवड. खूप शिकायचं अन् खूप मोठं काहीतरी व्हायचं हे तिनं अबोध मनाच्या उराशी कवटाळलेलं स्वप्न. त्यामुळे ती तशाही अवस्थेत शाळेत जाऊ
लागली. पण नंतर नंतर म्हणजे ती पाचवी-सहावीत गेली तसतसं पडण्याचं प्रमाण वाढू लागलं. मग तिच्या हातापायांमधला जोरही कमी होऊ लागला. अन् मग सुरू झाली तिच्या जन्माची चित्तरकथा. मृदुलाचं शिक्षण थांबलं. अंगात प्रचंड ऊर्जा. काहीतरी करण्याची ऊर्मी. ती तिला स्वस्थ बसू देईना. मग ती घरच्याच कपाटातली मिळतील ती पुस्तकं वाचू लागली. त्यात तिच्या हाती तेव्हा आजोबांची काही भविष्यविषयक पुस्तकं हाती आली. मग तिनं त्याचाच अभ्यास केला. समोर असं अधांतरी भविष्य दिसत असल्यानं तिला मग नैराश्यानं ग्रासलं. चिडचिड वाढली. हातात येईल ते फेकावंसं वाटू लागलं. पण मृदुलाचा मूळ गाभाच आनंदी अन् समाधानी असल्यानं तिनं त्या नैराश्यावरही आपल्यापरीने मात केली. दिसेल ते फक्त वाचत सुटणे हेच तिचं ध्येय बनून बसलं.

अशातच तिनं दहावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. मृदुलाचं लग्नही झालं, तिला खूप गोड अन्
अत्यंत देखणी मुलगी आहे. प्राची. ती आता बीकॉमला आहे. आपल्या आईचं सारंच ती मायेच्या
ममत्वानं करते. अगदी मृदुलाची आई बनून. वयाच्या एका आंधळ्या वळणावर सळसळत्या भावनांची भूक
भागविण्यासाठी मृदुलाशी त्यानं लग्न केलं. अपंग असलं तरी त्या कोवळ्या वयात तिच्या गोंडस
व्यक्तिमत्त्वाची तहान लागली त्याला, त्यानं त्या तहानेला सामाजिक भान असल्याचा चेहरा दिला...

मृदुलाच्या दुर्दैवी फेरयाचा दुसरा अध्याय म्हणजे तिचं लग्न. मृदुला आई-वडिलांकडे ज्या घरी राहायची
त्याच्या मागे एक दक्षिण भारतीय युवक राहायचा. तो नोकरीला होता रेल्वेमध्ये. एकदा तो नोकरीवर गेला
अन् त्याच्या घराचं मागचं दार उघडंच राहिलं. मृदुलाच्या ही बाब लक्षात आल्यानं तिनं त्या घराचं
आपल्याच घरातून नजर ठेवून दिवसभर राखण केली. ही बाब त्याला कळली अन् तो इम्प्रेस झाला. त्यानं
मग कालांतराने मृदुलाशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. मृदुलाला वास्तवाचं भान असल्याने तिला
या लग्नाला ठाम नकार होता. पण हा युवकही आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अन् एक दिवस
मृदुला बधली. लग्नाला कशीबशी तयार झाली. या मुलाने संसाराची सुरुवात तर तशी चांगली केली.
वेगळं घर घेतलं. अन् संसाराला सुरुवात झाली. पण काही दिवसांतच त्याचं मन भरताच त्याचा
मृदुलामधला रस हळूहळू कमी होऊ लागला.

अशातच तिला दिवस गेले होते. अन् त्यातच त्या नवरयाच्या तिला देणारया यातनांची इयत्तादेखील
वाढतच चालली होती. मृदुलाने ते नऊ महिने अत्यंत तणावाखाली काढले. आपल्याला होणारं मूलही
आपल्यासारखं अपंग जन्माला आलं तर... या एकाच विचाराने तिला ग्रासलं होतं, तिची झोप उडविली
होती. पण सुदैवाने नियतीने मृदुलाच्या ओच्यात एक सुंदर मुलगी घातली. मृदुलाच्या आत वसलेल्या एका
नितळ मनाची त्या ईश्वरीतत्त्वालासुद्धा कुठेतरी कणव आली असणार. म्हणूनच कदाचित प्राचीच्या जन्माचं
प्रयोजन असणार. तिच्या आईला नकुशी असणारया मृदुलाच्या पोटीही एक हवीहवीशी वाटणारी लेक
जन्माला आली.

कालांतराने मृदुलाचा नवरा दुसरयाच एका स्त्रीमध्ये गुंतला, अन् मद्रासला निघून गेला. मृदुलाचा जीवनाशी लढा सुरू झाला. एकटं कसं राहायचं, वडिलांनी जाण्याच्या आधी त्यांचा राहता फ्लॅट मृदुलाच्या नावे करून दिला. पण तोही तिने एकुलता एक असलेल्या आपल्या भावाच्या नावाने करून टाकला. पण जग हे उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होणारं असतं. त्याला सख्खे अन् रक्ताचे देखील अपवाद ठरत नाहीतच. समोर येणारया अनवट वाटा पार करीत कुठे कुठे फरफटत मृदुला आता एका दोन खोल्यांच्या घरात राहते. नवरा पोटगीदाखल जी रक्कम पाठवतो त्यात तिला भागवावं लागतं. त्यात नक्कीच भागत नसावं. प्राची आईला फुलासारखं जपते. तिचं सगळं लहान बाळासारखं करते. पोएटिक जस्टीस...

मृदुलाच्या नवरयानं दुसरं लग्न केलं पण त्याला मुलबाळं झालं नाही. आता तो गोंडस प्राचीला म्हणतो, तू माझ्याकडे ये. या माझ्या बायकोला आई म्हण. तू राजकन्याच आहेस माझी... प्राची बिकॉम फस्र्ट इयरला असलेली पण तिने बापाला ठाम नकार दिला. आईला सोडून येणार नाही अन् आईचं सौभाग्य हिसकावणारीला आई म्हणनार नाही. सुखात लोळण्यासाठी ऐनवेळी पाठ फिरविणारया बापाची राजकन्या होण्याऐवजी तिने संघर्ष करत झाशीची राणी होणे पत्करले... आजच्या पिढीत आयुष्याची समजच नाही, असे किमान प्राचीकडे पाहून तरी म्हणता येत नाही.

दरम्यान मृदुला श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग प्रकल्पाला जोडली गेली आहे. मृदुला
अतिशय टेक्नोसॅव्ही आहे. ती लॅपटॉप त्यातील इंटरनेट लीलया हाताळते. बोलताना अनेक इंग्रजी
शब्दांचा अस्खलित वापर करते. नेटवरून मेल्सद्वारा बाह्यजगाच्या संपर्कात असते. तिची वृत्ती तडफदार
असल्याने अन् मेंदू तल्लख असल्याने तिला हे सगळं चांगलं जमतंदेखील. माझं हे अपंगपण, माझी ही
कमजोरीच माझं बलस्थान ठरलं आहे, हे तिचं आणखीन अंतर्मुख करणारं बोलणं.
एक मन चांगलं असलं की मग अशा व्यक्तींना सगळंच चांगलं मिळत जातं. मृदुलालाही असंच एक
टवटवीत मन लाभलं आहे. नव्हे ते तसं तिनं घडवलं आहे. नियतीसकट तिची कुणाचबद्दल तक्रार नाही.
त्यामुळेच तिचा जनसंपर्कही दांडगा आहे. अन् मृदुलाची खरी पुंजी म्हणजे तिनं जमवलेली हीच चार
चांगली माणसं. तिच्या छोट्याशा घरात सतत ये जा असते. सतत राबता असतो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे
स्नेही येतात. त्यात अतुल वखरेंसारखे मग तिचे भाऊ बनून जातात, आपल्या घरची भाजी आणताना
तिच्याही घरी भाजी भरली जावी याची काळजी वाहतात, प्राचीचा मामा बनून तिची अगदी आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते...

मृदुलाचं आता एकच मागणं आहे. तिला घरबसल्या काहीतरी करू शकेल असं रोजगाराचं साधन हवं आहे. ज्यातून ती तिच्या गरजा भागवू शकेल. मृदुलाच्या हिमतीला तोड नाही. ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेतात, तरीही जी माणसं कुरकुरत असतात, आपल्याच आयुष्याला कोसत असतात अशांनी मृदुलाच्या घरी एकदातरी नक्कीच जावं, तिच्याशी मनमुराद बोलावं जादूची कांडी फिरावी तसं तुमच्या मनातलं मळभ क्षणात दूर करण्याची ताकद मृदुलाच्या शब्दांमध्ये आहे. तिच्या बोलण्यात निराशा नाही, भोगून गेलेल्या यातनामय प्रवासाचे कढ नाही, की जीवनाला कोसणे नाही.

आहे तो फक्त आशावाद अन् तो तिच्या देहबोलीतून अन् शब्दाशब्दांमधून झळकत असतो. ज्या जीवनाने
तिला दगा दिला त्या जीवनाची किमत तिला कळली आहे, तिच्या वाट्याला आलेल्या यातनांनीच
तिच्यासमोर ओशाळल्यागत व्हावे तिच्यासमोर नतमस्तक होत तिला शरण जावे एवढा अधिकार
तिनं आता निश्चितच मिळवला आहे...