Wednesday, 18 May 2011

'इंडिया' जिंकला भारताचे काय?

रबर अगदी तुटेपर्यंत ताणून सोडून दिल्यावर अचंब्यालाही अवचित वाटेल इतकी ऊसळी घेईल, अशी ती रात्र उसळलेली होती. जिंकणार का आपण? या प्रश्‍नाचे उत्तर टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूला मागण्यात येत होते. अखेर जिंकलो! अवघा इंडिया रस्त्यावर उतरला होता. अकरा, बारा, साडेबारा... आता मात्र तिच्या आईचा जीव तुटायला लागला होता. आता येऊन जायला हवं होतं ना... येईलना गं, हे कुटुंबातील इतरांचं समजावणं देखील आता पोकळ झालं होतं.

""ममा, मी अरोराकडे मॅच बघायला जाणार आहे. आम्ही सगळेच जमणार आहोत...'' तिनं सांगितलं होतं. आईनं मात्र परवानगीच मागतेय पोर या अर्थानं चार सूचना केल्या. अरोरा म्हणजे कुणी मैत्रीणच असेल, हा देखील आईचा आपल्याच पातळीवरचा विश्‍वास. बरं लेकीचं सांगणं हे "ममा'ला, आईला नव्हे. मॅच संपली. आपण (?) जिंकलो. आनंदही साजरा करून झाला. आता एक वाजत आलाय. मोबाईलची बेल जातेय, पण ती काही उचलत नाही. आईला मग परवा पाकिस्तान विरुद्ध मॅच जिंकल्यावर धरमपेठेत उत्साहानं दिराच्या गाडीत बघायला गेल्यावर तरुणाईनं केलेला विकृत उन्माद आठवला. त्यांचा उधाणलेला जल्लोश. त्यात आपण काय करतो आहोत, याचा बहुतांशांना विसर पडलेला. विश्‍वकप जिंकताक्षणी चौकांमध्ये अमर्याद गतीत बाईक्‍सचे रेसिंग, शॅंपेन फोडणे, अन्‌ या सर्वांवर ताण आणि सगळ्यात अश्‍लाघ्य प्रकार म्हणजे आजूबाजूच्या युवतींकडे बघून किंवा या पराक्रमी युवकांचे प्रताप कौतुकाने पाहण्यासाठी जमलेल्या बायाबापड्यांकडे पाहून या युवकांच्या तोंडून निघणाऱ्या अवार्च्य कॉमेंट्‌स. आईला आता काळजी वाटू लागली. इतरांनी आता खूप रात्र झालीय म्हणून सकाळी येईल म्हणत घरातले दिवे मालवले. तरणी लेक अपरात्री बाहेर असल्यावर घरातले दिवे मालविले गेले तरी आईचे डोळे मात्र मिटत नसतात.

किती वाजलेत माहिती नाही. दूरवर अजूनही ताशे वाजत असल्याचा क्षीण आवाज. आधी असे भजनाचे सूर यायचे कानावर यावेळी... फाटकाला कुणाचीतरी गाडी जोरात धडकल्याच्या आवाजानं त्यांचा वाडाच जागा होतो. माजलेत पोरं, चषक जिंकल्याचा दारुडा आनंद कसचा? असं म्हणत सगळे तावातावानं खाली गेलेले. खाली ती गाडीसह फाटकाजवळ पडलेली. तरीही तोंडानं, ""जित गया इंडिया, जित गया ना साला!'' अशी बडबड चाललीय. आईला कळत नाही. ती जीवाच्या आकांतानं विचारते, ""काय झालं गं? बरं नाही वाटत का? अहो चक्कर आलीय वाटतं पोरीला...'' शेजाऱ्याला कळलेलं पोरीला कसली चक्कर आलीय ती. मग ते बाहेर तमाशा नको म्हणून तिला आत नेतात. ""दारू प्यायलीस तू?''

""नाय, रम, रम... दारू नाही रम. जित गया इंडिया! पाकिस्तानको... , श्रीलंका की... '' तिची अर्वाच्य बडबड.
- मुलीच्या जातीला शोभतं का हे?
- मुलीच्याच कशाला मुलांनाही शोभत नाही.
- हा कसला आनंद?
- आता नुसती दारूच प्यायली की... हो नशेत कशाचं राहातं भान?

दुसऱ्या दिवशीची सकाळ- आई तिला घरातल्या देवघराजवळ ओढत नेऊन माफी मागायला आणि परत असं होणार नाही, अशी शपथ घ्यायला लावते. ती पण ""हंगामा क्‍यू बरपां?'' अशा बेफिकीर अविर्भावात, ""बोलली ना ममा मी, नाही ना होणार असलं. इंडिया काय
वारंवार जिंकतो का? 28 वर्षांनंतर जिंकला ना...''

इंडिया जिंकला तर ती कुणीतरी मॉडेलबया विवस्त्र होणार म्हणे. सामान्य घरची तरूणाई शरीराचं जाऊ द्या पण मनानं नागडी झाली. इंडियाच्या जिंकण्याची असली झिंग असेल तर नकोच जिंकायला!

इंग्रज निघून गेले. जाताना या देशाचे दोन नव्हे तर तीन तुकडे केलेत त्यांनी. पाकिस्तानचा एक अन्‌ भारत आणि इंडिया हे दोन. इंडिया विरुद्ध भारत हे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक या सगळ्या स्वरूपातलं युद्ध कायमचं धुमसत ठेवूनच ते गेले. त्यापाठोपाठ आलेला भौतिकवादही आमच्या इंद्रियांना खुणावू लागला, अन्‌ सुखावूही लागला. गगनचुंबी इमारतींमधला, मॉल्समधला टेक्‍नोसॅव्ही इंडिया भारताला अधिकाधिक केविलवाणं करीत सुटला आहे.

दोन दिवसांनी तीच पोर ओळखूच येत नव्हती. नववार, नाकात नथ, कपाळावर कुंकवाची चंद्रकोर, गळ्यात पुतळीमाळा... आई देखील तिचं हे रूप निवलेल्या डोळ्यांनी साठवून घेते आहे. घरापासून थोडी दूर आल्यावर ती मोबाईलचा आयपॉड कानाला लावते. कुठलंतरी ढिकच्याकऽऽ गाणं वाजतंय हे तिच्या बॉडीलॅंग्वेजवरून स्पष्टच दिसतंय. आता ती पाडवा "सेलीब्रेट' करायला निघाली आहे. कदाचित अरोराच्या घरीच!

आनंद साजरा करताना तो लाऊडलीच साजरा व्हायला हवा, प्रत्येकच आनंदाला सेलिब्रेशनचं गोंडस नाव देताना डीजेच्या तालावरच पावलं थिरकायला हवीत, संदल लावूनच नाचायला हवं- मग ते सण असोत, घरगुती समारंभ असो. मॅच जिंकण्याचा आनंद असो. पाडव्याच्या त्या पहाटेला देखील परवाची ती झिंगलेली रात्र सरलेलीच नाही, हे दिसत होतं. इंडिया जिंकल्याचा उन्माद तिच्या डोळ्यात अजूनही अन्‌ भारत नेहमीच का हरतो ही सल माझ्या डोळ्यात!

No comments:

Post a Comment