Wednesday 10 December 2014




मैत्रीण (दिवाळी अंक 2008)

(डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांची घेतलेली मुलाखत)

-भाग्यश्री पेठकर

मंदाकिनीच्या तटावरून...


शहरी वातावरणात, सुखवस्तू घरात वाढलेल्या डॉ. मंदा देशपांडे या तरुणीने डॉ. प्रकाश आमटेंच्या साथीने एक असिधाराव्रत स्वीकारलं. ज्या आदिवासींचा भाषाही कळत नव्हती, ज्यांना कधी बधितलंही नव्हतं, त्यांच्यामध्ये राहून त्यांच्या उत्थानासाठी कार्य करायचं ठरवलं. पण हा स्वप्नांचा मखमली मार्ग नव्हता. कशा चालल्या असतील त्या या मार्गावरून? आज मॅरसेसे पुरस्काराने सन्मानित झालेल्या या तपस्विनीची ही कहाणी, तिच्याच शब्दात...

कुण्या प्रेमिकांच्या भेटीला इतका मोठा सामाजिक कार्यकारणभाव असू शकतो का? सदतीस वर्षांपूर्वी ती दोघं एकमेकांना भेटली... त्यांची ती भेट गुलजार नव्हती. आवड होती, घट्ट निवड गोती, वचनेही होती पण ते सारेच असामान्य होते. तेव्हा त्यांच्या त्या भेटीच्या क्षणांच्या उदरात क्रांतीची बीजं रुजली होती... प्रियकर-प्रेयसीच्या भेटीत समाजासाठी आयुष्य वेचून टाकण्याच्या कांतिकारी शपथा!
त्यांची गाठभेट घालून देण्यात नियतीचं खास असं प्रयोजन दडलेलं होतं. एका ध्येयवेड्या विचाराने त्यांना झपाटलं  अन् त्याला कृतीची जोड देत त्यांनी एक संकल्प सोडला... विदर्भातल्या भामरागड परिसरातल्या, अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासींच्या उत्थानाचा. अतिशय खडतर आणि तितक्याच अवघड कार्याचा वसा त्या दोघांनी घेतला. तो वसा ती दोघं आजही तितक्याच इमानेइतबारे चालवीत आहेत, त्या कर्मयोगी जोडप्याचं नाव आहे मंदा आमटे आणि प्रकाश आमटे!
डॉ. प्रकाश आमटेंच्या वाट्याला बाबा आमटेंसारख्या दैवदुर्लभ महामेरूचा घरंदाज वारसाच होता. प्रकाश आमटेंचं ते संचित होतं, म्हटलं तर वारसाहक्काने चालून आलेली जबाबदारीच होती... मंदाताईंचं काय? एका सर्वसामान्य, धार्मिक, कर्मठ कुळात जन्माला आलेल्या मंदा देशपांडे नामक तरुणीनं, प्रेमात पडल्यावर दिसते मजला सुखचित्र नवे म्हणत उद्याच्या मांडलेल्या संसाराची गंधसोनेरी चित्रे रंगविली असती, तर ते काही चुकीचं ठरलं नसतं. तेही एमबीबीएस सारखं, पुढच्या, सर्वार्थानं संपन्न आयुष्याचा मार्ग प्रशस्त करणा-या उच्चशिक्षणात, सहाध्यायी असलेला सखा भेटल्यावर... गुबगुबीत बंगल्यात राहणा-या अशा अनेक यशस्वी डॉक्टरी जोड्या आपण पाहतोच की... वसंताला शब्द देण्याच्या वयात प्रकाश आमटेंनी आपला शब्द आदिवासींच्या सेवेला देऊन टाकला होता. मंदाताईंनी देखील हे पातिव्रत्य स्वीकारण्याचं वचन दिलं...
त्यांच्या प्रेमाने भामरागड परिसरातल्या आदिवासींना माणसासारखं जगण्याचा दिलासा दिला... पण त्यासाठी मंदा देशपांडे-आमटे नामक त्या तरुण विवाहितेला, सख्याच्या हाती फुलं देऊन काट्यांचा मार्ग स्वेच्छेने स्वीकारावा लागला. म्हणून परवा मॅगेसेसे घेऊन परतल्यावर नागपूर जवळच्या अशोकवनात या जोडप्याचं दर्शन घेतलं... मंदाताईंशी बोलणंही झालं. काळाजी कॅसेट रिव्हर्स झाली. आदिवासींचं जीवन समृद्ध करणारा मंदिकिनी चा हा प्रवाह कसा, कुठून आला, त्याने कशी वळणं घेतली... सारेच कळो आले!
मी काशीला गंगा पाहिली. शांत, स्थिर, प्रासादिक, गंभीर अन् खोलही... मंदाताईंना भेटल्यावर तोच भाव मनात दाटून आला. त्यांचा चेहरा कमालीचा आर्द्र- स्नेहाळ आहे. ममत्वानं भारलेल्या कर्तृत्वाचा शांतभाव त्यांच्या चेह-यावर पसरलेला असतो. आपल्या देशात अलीकडे फक्त देवांच्या मूर्तीच इतक्या शांत पाहता आल्या आहेत. मंदाताईंसमोर बसल्यावर काहीही न बोलकाच बरेच काही कळून जाते. असामान्य होण्यासाठी आधी सामान्य व्हावं लागतं. त्यांनी अजूनही त्यांच्यातलं सामान्यत्व जपलेलं आहे. जिनं जंगल म्हणजे सहलीसाठी गेल्यावरच पाहिलेलं आहे, ती मंदा लग्न करते अन् मधुचंद्रासाठी हेमलकसाला जाते... शब्दशः चंद्रमौळी झोपडीतच. दारही नाही, खिडक्याही नाहीत...
जरा त्यांची सुरुवात बघू. काय आहे की आजच्या मंदाताई पाहिल्यावर, ऊंSS त्यांनी हे करावं त्यात काय एवढं? असं कुणी म्हणू शकतं. (उंच हिमालय असं कसं म्हणायचं?) म्हणूनच या गंगेची सुरुवात बघू...
नागपुरातील श्री. वसंतराव व कुसुमावती देशपांडे यांची डॉ. मंदाताई ही कन्या. शिकून सवरून एक सर्वसामान्य जीवन जगण्याचे संस्कार बाळगून असलेलं त्यांचं सत्शील घराणं. मंदाताईंनी शालेय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांची श्री. प्रकाश आमटेंशी ओळख झाली. ओळखही शस्त्रक्रियागृहात... पुढे या जोडप्याला समाजातील विकृतींवर शस्त्रक्रिया करून, न्यून ते काढून टाकायचे असल्याचे नियतीला माहिती होते.. ओळख मैत्रीत अन् मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. आपल्यासाठी हाच जोडीदार योग्य आहे, असा दोघांच्याही मनांनी कौल दिला. अन् एका महत्कार्याचे सूतोवाच झाले... बाबा आमटेंबद्दल मंदाताईंना माहीत होतेच. त्यांच्या पुत्राच्याच प्रेमात पडल्यावर त्यात बाबांविषयी अन् त्यांच्या कार्याविषयी जाणिवेचाही प्रकाश पडला.
मंदाताई बाबा आमटेंच्या कामाने प्रभावित होत्याच. त्यातच प्रकाश आमटेंनी त्यांना, लग्नानंतर आदिवासींच्या उत्कर्षासाठी तुला माझी सोबत करण्याची तयारी असेल, तरच आपली ही सहजीवनाची स्वप्नं सत्यात उतरतील, असं सुचवल्यानंतर, मंदाताईंनी मम म्हणत आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाचा श्रीगणेशा केला.
तिथून त्यांच्या खाचखळग्यांनी भरलेल्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट बाजूला सारून चटणी भाकरीला प्राधान्य देणं, तसं सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडलंच. डॉक्टर होऊन शहरात स्थायिक होत, एक छानसं सुरक्षित असं कौटुंबिक जीवन व्यतीत करावं, असं कुणाला नाही वाटत? तेच मंदाताईंना वाटलं नसेल? पण या सगळ्यांवर मात करीत त्यांनी डॉ. प्रकाश आमटेंसोबत एका अग्निदिव्यात उडी घेतली. त्यात या दाम्पत्याचे पाय पोळले, (असं आपल्याला उगाच वाटतं, त्यांना नाही!) पण त्यातून आदिवासींच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या अंथरल्या गेल्या. अन् त्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळू लागला...
1971 मध्ये मंदाताईंचं डॉ. प्रकाश यांच्याशी लग्न झालं. मानवी आयुष्याला मुकलेल्या आदिवासींसाठी काहीतरी करायला हवं, या विचाराने बाबांना पछाडलं होतं. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्यावर आनंदवनाची जबाबदारी असल्याने ते काम बाबांनी डॉ. प्रकाश यांच्यावर सोपवलं होतं. आदिवासींसाठी कंबर कसलेल्या या जोडप्याला त्यांनी आशीर्वाद दिले आणि 1972 मध्ये, हेमलकसा येथे आदिवासींना हळूहळू डोळे किलकिले करून जगाकडे पाहण्याचं सामर्थ्य मिळू लागलं. नागपूरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावरील गडचिरोली या मागास आणि दुर्गम जिल्ह्यातील भामरागड, हेमलकसा येथे डॉ. मंदा, डॉ. प्रकाश, त्यांची मानलेली बहीण रेणुका आणि इतर स्वयंसेवकांसोबत तेथे एक झोपडी बांधली आणि आपल्या कामाचा झेंडा रोवत किचकट अशा कार्याला सुरुवात झाली. सभोवताली घनदाट जंगल... कुठलं संकट आलं, तर दूरदूरपर्यंत आपलं असं हाकेला कुणीच नाही... प्राणांची बाजी लावूनच या लोकांनी या होमकुंडात उडी घेतली होती!
पहिले काही दिवस तर तेथील अर्थनग्नावस्थेत असलेले माडिया, गोंड आदिवासी, या मंडळींना पाहून पळून जात. त्यांचा विश्वास संपादन करण्यात बराच कालावधी द्यावा लागला.
मंत्र-तंत्र, भूतप्रेत, करणी, भानामती, आदींवर विश्वास ठेवणा-या आदिवासी स्त्रिया आणि एकूणच जमात यांच्यात आरोग्याबद्दल जी अंधश्रद्धा परसली आहे, ती दूर करण्याचं महत्त्वाचं काम मंदाताईंनी हाती घेतलं. त्यासाठी भाषेचा अडथळा येऊ लागला. काही दिवसांत आदिवासींची माडिया भाषा शिकावी लागली. माडिया- मराठी असा शब्दकोशच मग या लोकांनी तयार केला. या मंडळींची अथक आणि प्रामाणिक कळकळ पाहून तेथील आदिवासींना हे आपले रक्षणकर्ते आहेत, असा विश्वास निर्माण झाला. एकदा एक तरुण रुग्ण, यांनी थाटलेल्या झोपडीतल्या रुग्णालयात आला. त्याला फिट्स यायच्या. डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश यांच्या अथक प्रयत्नांनी या तरुणाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली, त्यानंतर मग हळूहळू तेथील आदिवासी बांधव उपचार करून घेण्यासाठी पुढे धजावू लागले...
आजचे हेमलकसा वेगळे, भौतिक सुखसोयींना चटावलेले आपण, सामान्यपणे अजूनही तिथे दोन दिवसांच्या वर राहू शकणार नाही. तिथे या बाईनं अवघं आयुष्य काढलं. हेमलकसा येथे 1992 पर्यंत वीज नव्हती आणि 2001 पर्यंत दूरभाष नव्हते. एवढंच काय, पण पिण्यायोग्य पाणीदेखील मिळत नसे. साप, विंचू तसेच वाघ, अस्वलं या हिंस्त्र प्राण्यांचं सर्वत्र मुक्त साम्राज्य. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याने जखमी झालेले आदिवासीच त्यांच्याकडे रुग्ण म्हणून जास्त प्रमाणात यायचे. रुग्ण आले  की पुस्तकं वाचून वाचून त्यांच्यावर उपचार व्हायचे. अन् रुग्णाला आराम पडला या दाम्पत्याचे चेहरे आनंदाने आणि समाधानाने उजळून जायचे. मलेरिया, टीबी, डायरिया, कफ, गँगरिन, अल्सर यांचं या भागात थैमान. तशातच कुपोषणही. आमटे यांच्या या प्रकल्पाला सरकारने हेमलकसा भागात 50 एकर जागा उपलब्ध करून दिली. तेथे या दोघांनी लोकबिरादरी हॉस्पिटल उभारले. आज या रुग्णालयात दरवर्षी 40 हजार रुग्णांवर मोफत इलाज केले जातात. तेथे रुग्णांसाठी 50 खाटांची व्यवस्था आहे. दोन अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स आहेत. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून ते फ्रॅक्चरपर्यंतचे सगळे इलाज आज तेथे विनामूल्य उपलब्ध आहेत.
हेमलकसा परिसरातली एक गर्भवती महिला एकदा त्यांच्या झोपडीवजा रुग्णालयात आली. तिचे दिवस भरले होते. पण प्रसूति अतिशय क्लिष्ट होऊन बसली होती. त्यात बाळ व आई दोघांचेही प्राण जाण्याची शक्यता होती. प्रकाश व मंदा यांनी त्या महिलेला तपासलं आणि बाळाचा जीव गमवावा लागला तरी त्या महिलेचा जीव वाचविण्याची शाश्वती दिली. सुरुवातीला ती तयार होईना. मग तिची समजूत काढता काढता या लोकांची पुरेवाट झाली. त्यावेळी शल्यक्रियेला लागतात ती कुठलीच अद्ययावत सामग्री त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हती. होती ती केवळ एक प्रामाणिक कळकळ. त्या आदिवासींप्रती असलेल्या कळकळीतूनच त्यांना वेळोवेळी धैर्य मिळत गेलं. त्याप्रमाणे त्या महिलेचे तिथेच सिझेरियन झाले. बाळ दगावलं. पण माता सुरक्षित राहिली. काही वर्षांनी हीच स्त्री पुन्हा गर्भवती राहिली आणि प्रसूतिसाठी मंदा-प्रकाश यांच्याकडे दाखल झाली. तिची नॉर्मल प्रसूचि होऊन मुलगी झाली. तिचं बिरादरी असं नामकरण करण्यात आलं, हे मंदाताईंकडून प्रत्यक्ष ऐकून घेताना अंगावर रोमांच उभे राहत होते. पावसाळा आला, की हेमलकसा आणि परिसराला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रावती, बांडिया नदीच्या पुराचा वेढा जुलैपासून असायचा. त्यामुळे या प्रदेशाचा जवळपास सहा महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटलेला असायचा. त्यासाठी आधीच सहा महिन्यांची बेगमी करून ठेवावी लागायची. कणकेत अळ्या व्हायच्या. त्यामुळे त्यानंतरचं भोजन म्हणजे मुगाचं वरण आणि एकदा, दोनदा, तीनदा केवळ भातच भात. फळं, हिरव्या भाज्या डोळ्यांनी दिसत नसत. तेव्हा साधनाताई आनंदवनहून कितीतरी किलोमीटर लांब, आपल्या या मुला-नातवंडांसाठी पायपीट करीत ते जिन्नस घेऊन यायच्या.
आदिवासी क्षेत्रात काम करताना सुरुवातील मंदाताईंना अनेक क्लिष्ट अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यात एकाकीपणाची समस्या अधिक तीव्र होती. वाचन नाही. कुठलं मनोरंजन नाही. कौटुंबिक जीवन नाही. कुठल्या नातेवाईकांशी संबंध नाही, त्यांचा काही हालहवाल नाही... आणि सुरुवातीला आदिवासींचं सहकार्यदेखील नाही. अशाही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे उभी राहणारी ही माणसे कुठल्या मातीची बनली असतील, असा प्रश्न साहजिकच मनात उमटून जातोच.
मंदाताईंच्या हेमलकसामधील झोपडीत छपराला दो-या लटकाव्यात तसे साप लटकलेले असायचे. अन् पायाखाली विंचूंचं साम्राज्य!
कसे जगलात तुम्ही? मनातला प्रश्न बाहेर पडलाच. त्यांच्याशी मैत्री केली. कारण त्यांच्या इलाक्यात आम्ही अतिक्रमण केलं होतं. मंदाताई स्निग्ध हसत उत्तरल्या.
कितीही काही म्हटलं तरी किमान स्वतःसाठी हसावं तर वाटतं की नाही? छोट्या छोट्याच पण असंख्य इच्छा असतात. मंदाताईंना चित्रकलेची आवड होती. चित्र छान काढायच्या त्या. आदिवासींच्या जीवनाचं चित्र बदलताना कॅनव्हासवर चित्र उतरवायचं राहूनच गेलं. काही गोष्टींना पैसे लागत नाहीत फार, पण त्यातच खरा आनंद असतो. आता निवांत संध्याकाळी नव-यासोबत रम चहा घेत गप्पा मारायला फार काही लागत नाही. त्यानं आणलेल्या आण्याच्या गज-यातही मन हरखून जातं बाईचं... किमान कधी अगदीच लगटून नाही, तर हातात हात घालून फिरायला तरी पहाटेला...
सोबतच्या कार्यकर्त्यांना वेगळेपण वाटू नये म्हणून... त्या एवढंच म्हणतात. आयसोलेशनचा प्रॉब्लेम आला अर्थात त्यांच्या या सांगण्यात विषाद अजिबातच नव्हता.
मंदा-प्रकाश यांना पहिला मुलगा झाला, दिगंत. नागपूरहून ही शुभवार्ता प्रकाश यांच्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात पोहोचायलाच काही महिन्यांचा कालावधी लागला. नंतर अनिकेत झाला, तेव्हाही तेच हाल. मुलं कशी वाढली असतील त्या वातावरणा?  पुन्हा मनातल्या प्रश्नांनी उसळी मारलीच. आदिवासींच्या मुलांसोबतच वाढली, खेळली, शिकली. दरम्यान या मंडळींनी त्या भागात एक निवासी शाळा काढली होती. तिथं आदिवासी मुलं-मुली शिकायला यायची. त्यातच ही मुलं शिकली. एकच क्षण स्वतःला विचारून घ्यायचं, आपण आपल्या मुलांना अशा शाळेत घालू शकतो? त्यांचीही मुलं याच शाळेत असल्याने सुरुवातीला आदिवासींची एक-दोन मुलंच असायची नंतर मात्र संख्या वाढत गेली.
या सगळ्या जगावेगळ्या प्रवासात मंदाताई किंवा डॉ. प्रकाश यांच्यावर उद्विग्नतेचे, असहाय्यतेचे क्षण आलेच नसतील असं मुळीच नाही. तीही शेवटी माणसंच आहेत. दिगंत लहान होता. त्याला एकदा सेरेब्रल मलेरिया झाला. ताप उतरेना. पुस्तकं वाचून वाचून त्याच्यावर या धैर्यवान माय-बापाने इसाल केले. पण त्यानंतर त्याला फिट्स यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र पहिल्यांदा या खंबीर, धाडसी मातेच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा वाटून गेलं आपण शहरात असतो, तर आपल्या मुलाला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली असती.. पण हे विचार काही क्षणांपुरतेच. त्यांच्या झपाटलेपणापुढे या दुबळं करणा-या विचारांचा फार काळ टिकाव लागला नाही. कारण हे कार्य आपण स्वतःहून स्वीकारलं आहे, कुणीही त्यासाठी आपल्याला भरीस पाडलेलं नाही हे स्वतःलाच पटवीत डॉ. मंदा आमटे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्या. अन् एवढंच पुरेसं नव्हतं म्हणून की काय, एक आदिवासी अनाथ मुलागी दत्तक घेतली. ती आरती!
मंदाताईंना आदिवासींबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. धड खायला-प्यायला मिळत नसलेल्या या कुपोषित पट्ट्यात एकही भिकारी नाही, हे वास्तव एकून कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. तिथे चो-या होत नाहीत. या आदिवासींवर जंगलातले अस्वलादी हिंस्त्र प्राणी हल्ला करतात तेव्हा त्यांना अक्षरशः शंभर किंवा त्यावरही टाके घालावे लागतात. तेही भूल न देता घातले जातात पण त्यांच्या तोंडून हूं की चूं निघत नाही. त्या मानाने आपण फारच दुबळे आहोत, हेही मंदाताईंकडूनच कळलं. म्हणूनच मग मंदाताईंना हृदयविकाराचा एकदा हलकासा त्रास झाला. नागपूरला आणले. त्यातला तज्ज्ञ वगैरे डॉक्टर नव्हता. सलाईन लावले होते. ते संपले. नर्सचे लक्ष नव्हते. तिची वाट न बघता यांनी सलाईन बंद केले. काढून टाकले.
 डॉक्टर म्हणाले, आराम करा.
इथे कसला आराम? म्हणत ताई हेमलकस्याकडे निघाल्याही... ख-या अर्थाने मोठी माणसं स्वतःबद्दल बोलताना गप्प असतात. ती संकोचतात. त्या अर्थाने त्यांनी स्ववर विजयच मिळवलेला असतो. मग त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या आप्तांकडूनच.
सौ. विजयाताई शेवाळकर अगदी लेकीच्या मायेनं मंदाताईंबद्दल बोलतात. काय म्हणाली मंदा? ती स्वतःबद्दल जास्त बोलत नाही. मंदाबद्दल ऐकायचं असेल तर साधनाताईंकडून ऐक बाई... त्यांच्याचकडून तुला खरी मंदा कळेल. तिचं कौतुक करताना साधनाताईंना शब्द अपुरे पडतील अशी टिप्पणी देखील त्या करतात... असं कुणीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल अगदी उत्स्फूर्तपणे, निस्पृहपणे बोलून गेलं, कीच ती व्यक्ती सर्वार्थाने मोठी आहे असं समजावं.
दीनांच्या, उपेक्षितांच्या वाटेवर प्रकाश आणि विकासाचे पर्व आले. आदिवासींच्या जीवनाचे खोरे समृद्ध करीत मंदाकिनी धावली.
आता कर्मयोगी आमटे परिवाराचा वसा पुढे चालवायला त्यांची तिसरी पिढी तितच्याच उत्साहाने पुढे सरसावली आहे. मंदाताई व डॉ. प्रकाश यांचा मुलगा दिगंत हा सर्जन आहे. तोही हेमलकसा येथेच आदिवासींच्या सेवेत मग्न आहे. दिगंतची अर्धांगिनी अनघा ही देखील गायनॉकॉलॉजिस्ट आहे. ती खरे तर गोव्याची आहे. पण ती देखील हेमलकसाच्या लोकबिरादरी हॉस्पिटलमध्ये सेवारत आहे. मंदाताईंचा नातू चि. अर्णव तिथेच खेळतो बागडतो. पण आता परिस्थितीत आश्चर्यकारक सुधारणा आहे. आदिवासी त्यांच्या शिक्षणाप्रति, आरोग्याप्रति जागरूक झाला आहे. त्यामागे अर्थातच डॉ. मंदा व डॉ. प्रकाश आमटे त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी यांचे अथक परिश्रम दडलेले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या समिधांची आहुती, त्यांनी या होमात अर्पण केली. म्हणूनच आज हा तेजोदिवस बघण्याचा योग अखिल समाजाला लाभला आहे.
डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांना नुकतेच अतिशय प्रतिष्ठेच्या मॅगॅसेसे पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे. याआधीही त्यांना आदिवासी सेवा पुरस्कार, सावित्रीपाई पुरस्कार, हेडगे पुरस्कार, नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असे निस्पृह कार्य करणा-यांना कुठल्या पावतीची कधी गरज पडत नसते. त्यामुळे त्यांना पुरस्कारांचा हपाप नसतो. पुरस्कारच यांच्यासाठी बनलेले असतात आणि त्या पुरस्कारांचीच प्रतिष्ठा यांच्यामुळे वाढत असते.
मंदाताईंच्या स्निग्ध, निर्व्याज चेह-यावर आज समाधान आहे, ते आजच्या घडीला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्याचे! आणि तोच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.

- फेमिना या मासिकानं मंदाताईंवर नाईटिंगेल या शीर्षकांतर्गत लेख लिहिला होता. त्यात त्यांना नाईटिंगेल ही उपाधी दिली गेली होती.

- हेमलकसा आदी भागातील आदिवासींना मीठ पाहायला मिळत नव्हते. मीठ आणि भात हे त्यांचं मुख्य अन्न. मंदाताई आणि प्रकाश आमटेंनी जेव्हा आदिवासींसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा या उभयतांनी आदिवासींचं आयुष्यच आत्मसात केलं. ही दोघं आणि यांच्यासोबतची इतर मंडळी पावसाळ्यात जेव्हा संपर्क तुटायचा तेव्हा सहा महिने फक्त भात खाऊन राहायची. इतकंच नाही, तर स्वतःच्या मुलांनाही त्यांना त्याच सवयी लावल्या. त्यांची मुलंही आदिवासींसोबत नुसता मीठ-भात खायची, आदिवासींसाठी मंदा-प्रकाशची एवढी समर्पित वृत्ती अनुभवल्यानंतर एकदा बाबा म्हणाले होते, मला पुढचा जन्म मंदा-प्रकाशच्या पोटी मिळावा. 

-मध्ये एकदा डॉ. प्रकाश आमटेंना एका दुःसाध्य रोगाने ग्रासलं होतं. त्याची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी, हेमलकसाचं वातावरण आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असल्यानं ते गाव सोडण्याचा सल्ला त्यांना दिला. पण प्रकाश-मंदा यांनी तितक्याच निग्रहानं सांगितलं, आम्ही केवळ आमच्या आरोग्याचा विचार करणार नाही. हेमलसकातील बाकीच्यांच्या आरोग्याचं काय, ती लोकं तर पिढ्यान्पिढ्या तिथं आपलं जीवन कंठत आहेत. माझ्या एकट्याचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आम्ही दोघंही कदापि गाव सोडणार नाही. आपल्या नर-याच्या इच्छेचा प्रतिवाद मंदाताईंनी कधीच केला नाही. त्याही प्रकाशभैयांच्या निर्णयात उत्साहात सामील झाल्या. त्यांच्या प्रत्येक कार्यात मंदाताईंचा सिंहाचा वाटा होता. 

- मा. प्रा. राम शेवाळकर अगदी सहदभावाने सांगून जातात, पूर्वीच्या ऋषींच्या आश्रमात जसं दृष्य असायचं तसं दृष्य हेमलकसाला पाहायला मिळतं. निसर्गाशी अगदी घट्ट नातं असलेलं. अखिल सजिवांवर सारखंच प्रेम करणारं, भेदभावरहित. चि. मंदा आणि चि. प्रकाश ही दोघं वयानं लहान असली, तरी ती दोघं ऋषीतुल्यच आहेत. हे सांगताना राम शेवाळकरांना कंठ दाटून येतो. त्यांचे डोळे या उभयतांप्रतिच्या स्नेहाने भरून येतात...


No comments:

Post a Comment