Monday, 3 February 2014

facebook.comतू आता परत यायला हवीस...

डोळ्यांमध्ये उदंड स्वप्न बाळगत अतिशय महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत त्या जन्माला येतात. खूप खूप शिकतात. अगदी ठरल्याप्रमाणे यशाची एक एक शिखरं पार करतात. अतिमहत्त्वाकांक्षी लोकांची काही गणितं असतात. त्यानुसारच सगळं झालेलं त्यांना हवं असतं. यात आपली जवळची काही माणसं भरडल्या जातात, त्यांच्या इवल्याइवल्या भावना पायदळी तुडवल्या जातात, याचंही त्यांना भान नसतं....
तीही अशीच एक. लेक्चररशीप, त्यातच पीएच.डी. व्हायलाच हवी आता... त्यातच खूप महागडा फ्लॅट बुक करून ठेवलेला. त्याचं इंटेरियर मनासारखंच व्हायला हवं. त्यामुळे तिकडे रोज एक चक्कर. शेवटी स्वप्नातलं घरही साकार झालेलं. पण त्यात तिला मनभरून राहताही न आलेलं... 
पीए.डी.चं काम तोंडावर आलेलं. घरी यायला उशीर. मुलाची बाराबारा तास भेट नाही. त्याचा स्ट्रेन येऊन त्याची परिणती अखेर स्वतःचा जीव गमावण्यात झालेली. अशा एका (आता नसलेल्या) आईच्या मुलानं तिला लिहिलेलं एक पत्र...
प्रिय (नसलेल्या) आईला,
तू खास माझ्यासाठी तयार करवून घेतलेल्या स्टडीटेबलवर अभ्यास करत बसलो आहे. मॅडमने आईवर एसे लिहून आणायला सांगितला आहे. काय लिहावं सुचत नाही. तू असतीस तर विचारलं असतं. या माझ्या खिडकीतून एक खूप मोठ्ठं झाड मला दिसायचं, पण आता त्यासमोर दोन मोठाल्या इमारती उभ्या होत असल्यानं ते झाड आता दिसेनासं झालेलं, तू जशी दिसेनाशी झाली तसंच. तुझ्यासमोर तुझ्या कामांच्या खूप मोठमोठ्या भिंती उभ्या झाल्या होत्या ना? आज शाळेच्या ट्रीपला गेलो होतो. सगळ्या मुलांनी खूप छान छान पदार्थ आणले होते. एक मित्र म्हणाला, माझी आई तर डबा बनवायला पहाटे चार वाजताच उठून बसली. मी मात्र पिझ्झा आणि बर्गर नेलं. काल बाबांनी फ्रिजमध्ये आणून ठेवलं होतं. तू मागच्या वर्षी ट्रीपला जाताना करून दिलेली पुरी-भाजी आठवली...
तू लावलेल्या शिस्तीप्रमाणे मी शाळेचा टिफीन रोज ओट्यावर नेऊन ठेवतो. कधी त्यात काही उरलेलं असतं. सकाळी घाईच्या वेळी बाई डबा भरताना कुरकुरते, तिला तो घासून घ्यावा लागतो ना म्हणून. मी डबा संपवला की नाही हे तू नेमानं बघायचीच.
एक आबा नानीला भेटायला आले होते. 'तिला (म्हणजे तुला) खूप एक्झर्शन झालं, अभ्यासाचा ताण आला,,,' असं नानी त्यांना म्हणाली. तेव्हा ते आबा म्हणाले, 'सुपरवुमन बनायच्या नादात या मुली काय काय गमावून बसतात. वेळप्रसंगी जीव सुद्धा. याचं त्यांना भान राहिलेलं नाही.' सुपरमॅन माहीत आहे, सुपरवुमन हे कोणतं नवीन कॅरेक्टर आहे कळलं नाही. तुलाही सुपरवुमन बनायचं होतं?
कधी कधी नानी मला पोटाशी घेऊन खूप रडते. 'आपण दोघं सारखे'. असं म्हणते. सारखे कसे? नानीची खूप म्हातारी झालेली आई तर अजूनही जिवंत आहे. ती कमी शिकली म्हणून ती अजूनही जिवंत आहे काय?
एवढ्यातच माझ्या वर्गातल्या मित्राच्या आईच्या गाडीला अॅक्सीडेंट झाला. ती खूप शिकली होती. पण तरीही तिला अजून शिकायचं होतं म्हणून तिनं कॉलेज जॉईन केलं होतं. त्याला शाळेतून घ्यायला उशीर झालाय म्हणून ती घाईनं कॉलेजमधून निघाली, पण त्याच्यापर्यंत पोचलीच नाही... आता तो आणि मी सारखे झालो, हे मात्र नानीला सांगायला पाहिजे.
माझं शार्पनर हरवलं, अशावेळी तुझं ड्रॉवर म्हणजे अलीबाबाची गुहाच. माझी असं काही काही हरवायची सवय तुला माहीत असल्यानं रबर, पेन्सिल, शार्पनर्स एक्स्ट्रा ठेवायची तुझी सवय. इनरजन्सीमध्ये माझी मात्र सोय. तुझं ड्रॉवर उघडलं, त्यात मागच्या वर्षी मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिलेलं ते छोटंसं टेडी दिसलं. ते तसंच नवीन आहे. किती जपून ठेवलंस ते स्वतःपेक्षाही. तू स्वतःलाही इतकं जपलं असतंस तर...
थंडी आता सुरू झाली आहे. तू सुटकेसमध्ये डांबराच्या गोळ्या घालून ठेवून दिलेली स्वेटर्स काढली. गोळ्या अंगावर उड्या मारत पळून गेल्या. थंडी संपल्यावर त्यांच्यासकट स्वेटर्स परत त्या सुटकेसमध्ये जातील की नाही, याचा त्या गोळ्यांनाही  भरवसा वाटला नसेल का?
समोरच्या फडफडणा-या कॅलेंडरवर या महिन्यातल्या तुझ्या वाढदिवसाची तारीख मला खुणावते आहे. यावर्षी तुला काय द्यावं, हा प्रश्नच सतावत नाही आता. माझ्यासाठी तो प्रश्न शिल्लकच ठेवला नाही तू.
त्या रात्री तू माझ्या केसांमधून खूप वेळ हात फिरवत राहिली. मी निजलो अन् सकाळी उठलो, तर तू नव्हतीसच बाजूला...
'सगळ्या दुःखांवर काळ हेच एक औषध असतं. पडेल विसर त्याला हळूहळू...' असंच काहीतरी परवा कोणी म्हणालं. पण मला तर उलटंच वाटतंय. माणसं गावाला गेली की काही दिवस काही वाटत नाही, नंतर मात्र ती परत यावी असं वाटतं, मलाही आता नेमकं तसंच वाटतंय. तू आता परत यायला हवीस, येतेय ना?

('जगण्यातले काजवे' दै. 'सकाळ' मधील सदरातील एक भाग.)

No comments:

Post a Comment